पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : योग्या ( योगेश )
''तुम बेसहारा हो तो, किसी का सहारा बनो - तुमको अपने आप ही सहारा मिल जायेगा !! '' मला आत्ता हे गाणं ऐकतांना योग्या डोळ्या समोर येतो.
१७-१८ वर्षांपूर्वी मला योग्या भेटला. बहिणीच्या नाटकाची तालीम बघायला गेले होते. हौशी कलाकारांच्या घोळक्यात मी पहिल्यांदा 'योग्या' ला भेटले. खरं नाव - योगेश बाविस्कर. त्या नाटकामध्ये त्याच काम सगळ्या कामांवर लक्ष ठेवणं हे आहे, अश्या attitude मध्ये हा होता. सगळ्यांना हसवणे आणि स्वतः हसत रहाणे हा छंद ! तेव्हा होता आणि आज ही आहे.
काही वेळाने घरी जायला निघालो. मित्रांनी / मैत्रिणींनी त्याचा हात पकडून आळी पाळीने स्टेशन पर्यंत पोहचवलं. आणि त्या दिवशी मला योग्या बद्दल हे कळलं - योग्याला फक्त १ फूट अंतरावरच दिसतं. त्या पलीकडे त्याला दिसत नाही. त्याच्या आजार वाढत जाणार आहे, आणि हळूहळू त्याचं दिसणं बंद होईल. योग्याने मनाची तयारी खूप आधीच केलेली होती. त्यामुळे तो लढत राहिला.
योग्या एकदम जिंदादिल माणूस आहे. तो कोणा बरोबर पण ओळख काढुन गप्पा मारू शकतो. आणि सगळे त्याचे फॅन्स आहेत, हे तो मला नेहमी सांगत असतो. हॉस्पिटल मधल्या नर्सेस पासून ते विकलांगांच्या डब्ब्यात सगळे त्याच्या वर फिदा आहेत, असा आत्मविश्वास योग्याला आहे. आणि तो खरा पण आहे. गप्पा मारतो आवाजांमधून तो खूप निरीक्षण करत असतो. मग तो मूड मध्ये असला की, कोण कोणत्या style मध्ये काय बोलतं हे त्याच्या कडून ऐकण्यासारखं असतं.
कॉलेज चे दिवस होते. एकदा मी आणि योग्या उल्हासनगर स्टेशन ला बसलो होतो. त्याला अचानक आठवलं की, त्याचा पास संपलाय आणि बदलापूर स्टेशन ला या वेळी TC असतो. आत्ता हा प्रश्न निर्माण होऊन काही क्षण गेले होते. समोरून एक ट्रेन आली. त्यामधून एक तृतीयपंथी उतरला. तो रोज या वेळी उल्हासनगर स्टेशनला असायचा. योग्या सरळं त्याच्या कडे जाऊन म्हणाला की,'' मेरा पास खत्म हो गया है, मुझे साथ मे लेके चलो. तुमको कोई ticket भी नही पुछता है '' त्याने योग्याला घेऊन तीच ट्रेन पकडली आणि नीट बदलापूरला पोहचवलं. मी विचार करेपर्यंत योग्या solution काढून मोकळा झालेला होता. तो प्रॉब्लेम्स वर अडकून बसत नाही.
त्याला brail येत नव्हतं. तरी योग्याने पोस्ट graduation केलं. टॉल्किंग कॉम्प्युटर्सचे कोर्सेस केले. जॉब साठी खूप भटकला. काही केल्या जॉब मिळेना. ''एखाद्या टपरीवर कोणी कपबश्या धुवायला ठेवलं तरी मी धुवेन '' इतक्या काकुळतीने त्याने जॉब शोधला. नशिबाने त्याला गव्हर्मेंट जॉब मिळाला तर तो नागपूरला. एखाद्या नवख्या शहरात जिथे आपल्याला कोणीच ओळखत नाही, तिकडचं हवामान आपल्याला मानवत नाही, अश्या ठिकाणी योग्याने जाऊन जॉब केला. इतकचं कमी होत की काय, ऑफिसर्स देखील अगदीच नॉन कॉपरेटिव्ह ! मला योग्याच खूप कौतुक वाटतं, की तो पळुन आला नाही. तो थांबला. तो लढला आणि मुंबई मध्ये पर्मनंटचा शिक्का घेऊनच परतला.
आई वडिलांचा थोडा भार हलका होत असताना योग्या च्या आईला blockages झाले. एखाद्या ऍक्टिव्ह आणि नॉर्मल मुलाने जितकी धावपळ केली असती, ती सगळी करतांना मी योग्याला पाहिलं. पण काही महिन्यात दुःखाचा डोंगर कोसळला आणि आई गेली!
वडील घरात जेवण बनवण्या पासून सगळी काम स्वतः करू लागले. मग हळूहळू योग्याने जेवण बनवणं पण शिकून घेतलं. घरात कोणी तरी हक्काचं माणूस हवं म्हणून वडीलांनी जीवाचं रान केलं. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न येतात. मग योग्याची case तर एकदम डिफिकल्ट होती. पण त्याला मनासारखी अपर्णा भेटली. चेहऱ्यावर थोडं व्यंग होत, पण त्या दोघचं जमलं नीट! पण वर्षाच्या आत एका छोट्या surgery मध्ये इन्फेकशनच निमित्त झालं आणि अपर्णा गेली. भयंकर एकटेपणाने त्याला वेढलं. त्याला त्या आघातांमधून बाहेर यायला बराच वेळ लागलाय. आत्ता ऑफिस, काम आणि social वर्क इतकंच आयुष्य आहे. असं मानत त्याने जगायचं ठरवलं होतं. त्याला दिसत नसलं तरी तो अंधांसाठी बरंच कार्य करतो. त्यांच्यासाठी ऑडिओ लायब्ररी केलीये. पुस्तकांची ट्रान्सलेशन्स आणि ऑडिओ रेकॉर्डिंग असे बरेच खटाटोप करत राहतो. तो केविलवाणा होऊन बसुन राहत नाही. तो भुईसपाट होईल असं वाटत असतांना, तो रुजतो आणि उगवतो.
मागे परत एकदा योग्याचा फोन आला. पापांना कोरोना होऊन गेला. मग त्या नंतर किडनी इन्फेकशन झालेलं. आत्ता बरे आहेत आणि मी लग्न करतोय!
मला जितका आनंद झाला त्या पेक्षा जास्त मला काळजी वाटली. मी विचारलं. कोणाशी करतोयस? म्हणाला सिद्धी नावाची मुलगी आहे, वडील लहानपणीच गेलेत. तिच्या आईशी करतोय! योग्याने या वेळी जवाबदारी स्वीकारली. पण त्या मध्ये खूप आनंद आहे त्याला. हल्ली फोन केला की तो तिच्या बरोबर गप्पा मारत असतो. शॉपिंग करत असतो. खूप वर्षांनी माझी जागा त्याच्या दुसऱ्या मैत्रिणीने घेतली याचा आनंद होतो मला. नव्या वाहिनी बरोबर पण संसार हळूहळू फुलतोय. आणि फुलत राहावा अशी प्रार्थना!
आज योग्याचा वाढदिवस आणि मोतीबिंदूच operation पण ! एस्सेलवर्ल्ड च्या पिकनिकला जितक्या हौशेने कोणी जाईल, तितक्या हौशेने operation ला मज्जेत गेलाय. आयुष्याच्या इतक्या मोठ्या रोलर कोस्टर ride मधुन गेल्यामुळे कदाचित आजचं operation त्याला छोटचं वाटतं असेल. योग्याला बघुन मी प्रॉब्लेम्स वर सोल्युशन्स काढायला शिकलेय. डोळ्यातलं पाणी पुसून गायला शिकलेय. योग्या!! या पुढे तुझ्या वाटेवरचे काटे संपून फक्त फुले असावीत अश्या शुभेच्छा! योग्याला बघुन माझ्या नशिबात देवाने भरभरून दिलंय, हे सतत लक्षात येतं ! म्हणुन योग्या तू माझ्यासाठी लकी आहेस !

Comments
Post a Comment