दिव्यत्वाची येथे प्रचिती ..
एखादी नियमबाह्य गोष्ट अकस्मात घडली की, ती जादु किंवा चमत्कार वाटू लागते. पण खऱ्या अर्थाने आयुष्यात अश्या अनेक गोष्टी क्षणाक्षणाला, आजू बाजुला माझ्या बरोबर पण घडत आहेत. ज्यांचा हिशोब मी ठेवला नाही म्हणून त्या लक्षात राहिल्या नाहीत. गेली काही वर्ष मला अस्थम्याचा त्रास होतो. एक एक श्वास घेणं जड होऊ लागतं. पण त्या आधी आणि आत्ता पर्यंत अनेक श्वास मी खूप सहज घेतले आणि सोडले आहेत. जर माझ्या साध्या श्वासांवर पण माझा कंट्रोल नसेल, तर माझा प्रत्येक श्वास चमत्कारचं तर आहे. माझ्या खिडकी मधुन मी नेहमी एक झाड बघते. त्याची पानगळ होते. पाऊस पडला की त्याला पालवी फुटते. काल पर्यंत शुष्क वाटणारं झाड, जीवनदायी होऊन जातं. त्या झाडावर पक्षांनी आत्ता घरटं पण बांधलं आहे. या झाडाच्या फांदीवर विश्वास ठेऊन पक्षी आपलं आख्ख घर वसवतं आहेत. खरं तर हे झाडं काल पर्यंत शुष्क, आणि मरणाच्या दारात उभं असल्या सारखं वाटतं असतांना, ते अचानक जगायला लागलं. आणि दुसऱ्यांच्या जगण्याचं कारण पण बनलं. निसर्गाची ही निर्मिती युगानुयुगे चालू आहे. फक्त माझं त्याकडे लक्ष गेलं नाही. पण डोळे उघडुन बघितलं तर, हा चमत्कारचं आ...