पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : रोहिणी काकी
अत्यंत गोलाकार चेहरा, त्यातून अजून दोन गोल लावुन बनवल्या सारखे गोबरे गाल, या गोलाला शोभेल अशी गोलाकार टिकली, थोडा स्थूल बांधा, खुप साऱ्या जवाबदाऱ्या एकाचं वेळी पेलण्याची प्रचंड ताकद, अश्या काकी आहेत. मी बऱ्याचं वेळा चित्रांमध्ये खूप हात असलेली multitasking स्त्री बघते, तेव्हा मला रोहिणी काकींचा भास होऊन जातो. मी लग्न करून लालबागला राहायला गेले तेव्हा, 'सासर' पेक्षा तिकडच्या 'कल्चर' मध्ये जमवुन घेणं माझ्या साठी आव्हान होतं. आत्तापर्यंत फ्लॅट मध्ये वाढल्यामुळे, स्वतःच्या जगात जगणारी होते. लालबागला आल्यानंतर अचानक खूप सारी माणसं घरात, दारांत आणि आजुबाजुला दिसायला लागली होती. आमच्या मजल्यावर सुमारे ३५-४० घरं होती. सगळ्यांना एकमेकांच्या घरातले, जवळचे - दूरचे नातेवाईक, मित्र मैत्रिणी माहीत असायचे. त्यातचं लालबागचे लोकं आपण आयुष्यात सण साजरे करून मज्जा करण्यासाठी जन्माला आलेले आहोत, असे असतात. एकमेकांच्या घरात यायला जायला कोणाला कोणाची permission लागत नाही. त्याच मजल्यावर १-२ जाच करणाऱ्या म्हाताऱ्या. सुनेने कसं राहायचं, हिरव्या बांगड्या घातल्याचं पाहिजेत, टिकली कुठे आहे हे शि...