पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : सखी

मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये झालेली ओळख, आयुष्यभराच्या मैत्री मध्ये बदलुन टाकणारी... मला माया, उदात्तता आणि नेहमी हसणं अश्या गुणांनी संपन्न करणारी 'सखी'!. 

मी जवळजवळ १५ वर्षांपूर्वी नेरळ ते ठाणे प्रवास करायचे. मी नुकतीच graduation संपवुन कामाला लागलेले! नेरळला ऐसपैस बसायला जागा मिळायची. बदलापूर आलं की, धाड पडल्यासारखी ट्रेन भरून जायची. पुढे रोज रोज सेम ट्रेन मध्ये चढणारे चेहरे ओळखीचे झाले. मला स्वतःहून ओळख करायची असेल, तर मी थोडी बावरते. पण पूर्वी पासून मला माणसं बघायला आवडतात, म्हणून मी बसल्या बसल्या सगळ्यांना बघत बसायचे. बदलापूरला माय लेकी चढायच्या. लेकीची तर सगळ्या डब्यात सगळ्यांबरोबर ओळख! गोरीपान, घाऱ्या डोळ्यांची, एकदम सुंदर. गुबगुबीत होती. ती सगळ्यांबरोबर मस्त गप्पा मारायची. मला हे जमत नसल्यामुळे मला तिचा हेवा वाटायचा. मग तिने स्वतःच माझ्या बरोबर ओळख करून घेतली. तिच्या बरोबर चढणारी, एकदम एका साच्यातून दोन चेहरे काढावेत इतकी सेम दिसणारी.. तिची आई नसून तिची सासू आहे ही नवी माहिती मिळाली. मला नवलचं वाटलं. खरं तर सासुला 'अग आई' असं म्हणणारी, मी पाहिलेली पहिली आणि एकमेव व्यक्ती सखी आहे. मी तिला विचारलं की, ''सखी, तू सासूला अहो आई असा मानपान न देता, अग आई कसं म्हणतेस?'' ती म्हणाली,'' आपली आईचं आहे, असं मानल्यावर परकेपणा कशाला करायचा? मला फॉर्मॅलिटी नाही जमतं.'' सखी सगळ्यापेक्षा वेगळी होती. मला जाम आवडली. (जाम म्हणजे खूप, हा शब्द सखीनेच शिकवलाय)

सखी मुळे माझी सगळ्यांबरोबर ओळख झाली. मग लोकल ट्रेन मध्ये आम्ही अनेक गोष्टी सेलेब्रेट केल्या. नवरात्रीच्या नऊ रंगांचे ड्रेस घातले. भोंडला साजरा केला. या सगळ्या उत्साहात आणि उत्सवात मी सखीला बघत राहायचे. तिला सगळ्यांबरोबर जमवुन घेता येत होत. ती कोणाला परकेपणा जाणवू द्यायची नाही. मदत करणे, सीट शेअर करणे हे ती मस्त करायची. तिला सगळ्यांचे प्रॉब्लेम्स माहित असायचे, पण एका कानाच दुसऱ्या कानाला तिने कळू दिल नाही. एकदा मला ट्रेन मध्ये उलटी झाली तर डोअर ला जाऊन पाठीवर फिरवायला सखी हजर. ती कधी कोणाबद्दल वाईट बोलली नाही. गॉसिप करणारी नव्हती. मी माझा स्वतःचा बिझनेस सुरु करू शकते, हा आत्मविश्वास जर कोणी सगळ्यात आधी माझ्यात निर्माण केला असेल तर तो सखीने! इतकेच नाही तर तिने मला यथायोग्य मदत पण केली. 

पुढे मी आणि सखी सेम ट्रेनने परतीचा प्रवास पण करू लागलो. ठाण्याला ट्रेन आधीच गच्च भरून यायची. डोअरचा एक दांडा पकडुन थोडं पळायचं. २-३ जणी ठाण्याला उतरल्या की, लगेच त्या चालत्या ट्रेन मध्ये चढायचं. असं आमचं चालू होत. मी पुढे, सखी नेहमी माझ्या पाठी. कर्जत ट्रेन एका तासाने एकच यायची त्यामुळे, ती ट्रेन पकडण्याशिवाय पर्यायचं नसायचा. एके दिवशी अशीच ट्रेन पकडतांना माझा पाय सटकला. मी आधीच तेव्हा ३६ किलोची.. फलाट आणि ट्रेन मधल्या गॅप मध्ये सहज पडून गेले. दोन्ही पाय खाली. मी जशी एका क्षणात ट्रेनच्या खाली गेले. सखीने एका क्षणाचा विलंब न लावता तिचं प्रसंगावधान दाखवलं. तिने माझे दोन्ही खांदे पकडुन मला वरती काढलं. मला ट्रेन मध्ये ढकलून सखी माझ्या मागे चढली पण! पुढचे काही मिनिटे तर आम्ही दोघी फक्त थरथर कापात होतो. त्या दिवशी सखी नसती तर काय झालं असतं, या विचाराने आजही माझा थरकाप होतो. 

सखी आवर्जून माझ्या लग्नाला हजर झाली. हळदीला घरचीच असल्यासारखी वावरली. जिथे आहोत तिकडचं होऊन जाण तिचा स्वभाव आहे. तिच्या ऑफिस मध्ये पण ती सगळ्यांना आपलीच वाटावी अशी होती. पुढे ती मुंबई सोडून पुण्याला स्थायिक झाली. माझी नेहमीची ट्रेन सुटली. पण सखी बरोबरची गट्टी सुटली नाही. नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो. खळखळून हसलो. ती कधी डाउन नव्हती. उत्साहाने भरलेली होती. लग्नांनानंतर काही वर्षांनी मी 'मुलं न होण्याच्या' एका प्रवाहातून बरेच वर्ष जात होते. सखीचं लग्न तर माझ्या आधी झालेलं. ती देखील त्याचं तश्याच परिस्थिती मधुन जात होतीच. कदाचित माझ्या पेक्षा जास्त होरपळली असेल. अनेक महिने मग माझं आणि सखीच बोलणं झालं नाही.  

एके दिवशी मला वॉट्स अँप वर सखी आणि तिच्या इतक्याच गोड बाळाचा फोटो आला. नंबर सखींचाच आहे, मी खात्री करून घेतली. आनंदाने उडी मारून, मी सखीला कॉल केला. ''सखी, बाळ कधी झालं?'' मी सखीला नेहमी आनंदच बघितलं आहे. पण त्या दिवशीचा सखीचा आनंद खूप विलक्षण होता. तिचा आवाज नेहमीपेक्षा खूप जास्त भारलेला होता. म्हणाली,'' मी दत्तक घेतलं, उद्या घरी आणनार आहे तिला. ज्यांना खरचं आनंद होईल, त्यांना सगळ्यांना आज कळवलं.'' मला काही क्षण कानांवर विश्वासच बसेना. मी फोटो परत एकदा बघत विचारलं, '' कसं शक्य आहे सखी, ती (बाळ) सेम तुझ्या सारखी दिसते. तू आणि तुझी सासू सेम दिसत तश्या ?'' सखी आनंदाच्या भरात होती. मी त्यानंतर २ दिवस तो फोटो किती तरी वेळा परत परत बघितला. आज या घटनेला ६-७ वर्ष होऊन गेली आहेत. एकाच साच्यातून काढलेल्या चेहऱ्यासारख्या माय लेकी बघुन मला आज पण अप्रूप वाटत राहत. खुप जीव लावून सखी छोट्या सखीला मोठी करेल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र पण शंका नाही. 

सखी! जगण्याच्या बाबतीतले धडे मला अनेकांनी दिले, तू मला दुसऱ्यांना जगवण्याचे धडे दिलेस. तू मला मन मोठं ठेवून सगळ्यांना सामावून घेणं शिकवलस. माणूस म्हणून जन्माला आपण सगळेच आले आहोत, पण माणूस म्हणून जगणं समृद्ध करणं तू मला शिकवलंस. लोक आपल्या बद्दल काय विचार करतात, याचा विचार न करता आपण आपलं काम चोख बजावायचं.. हे तू करून दाखवलस. प्रॉब्लेम्स सगळ्यांना आहेत, तू सोलुशन झालीस. तू बेस्ट आहेस!  अशीच रहा !


Comments

Popular posts from this blog

ये इश्क, मुझे इश्क है तुमसे..

Radheshyam Ji Shraddhanjali

Satguru Babaji