पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : निमाई
प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणी मागे त्या व्यक्तीच्या आई आणि वडिलांचा मोठा सहभाग असतो. माझ्या जडणघडणी मध्ये आई आणि मावशीचा सहभाग आहे.
नीमा मावशी - अत्यंत सुंदर चेहरा, कर्तव्यनिष्ठ आई. नीटनेटकेपणा आणि टापटीपपणा तिच्या प्रत्येक कामा मध्ये दिसून येतो.
परिस्थितीचे अनेक काटे तिला कमी वयात टोचतं राहिले आले आहेत, पण माझ्या वाट्याला फुलं यावीत यासाठी तिने जीवाचं रान केलं आहे. ती १७ वर्षाची असतांना काका पदरात दोन मुलं( एक मुलगा दीड वर्षाचा - दुसऱ्यासाठी ती गरोदर ) आणि असंख्य प्रश्न तिच्या पदरात टाकून गेले. पण ती पदर खोचुन उभी राहिली. काकांची येणारी तुटपुंजी पेन्शन आणि तिला येणारं शिवणकाम यावर तिने एका मुलाला इंजिनिअर आणि दुसऱ्या मुलाला MBA केलं. खरं तर आपल्या ताटात २ चपात्या असतांना अर्धी दुसऱ्यांना देणं, यासाठी मोठं धैर्य लागत नाही. पण आपलं पोट भरण्याचा प्रश्न समोर असतांना आपण दुसऱ्याचा विचार करावा यासाठी जे मोठं मन लागतं, ते मावशीचं आहे. मी ४-५ वर्षाची असतांना मावशी मला शिक्षणासाठी मुंबई ला घेऊन आली. दोघे दादा शिकायचं होते. महिन्याच्या शेवटी शेवटी तर घरात अजिबातच पैसे उरायचे नाहीत. तरी तिने तिच्या परीने सगळं सांभाळून घेण्याचा आतोनात प्रयत्न केला. अश्या परिस्थिती मध्ये तिने माझी जवाबदारी संभाळून तिने तिची ताकद पणाला लावली होती.
मावशी अत्यंत शिस्तप्रिय आहे. मोठ्यांना आदर करणे, एखादं काम कोणी सांगितलं तर क्षणाचाही विलंब न करता तत्पर करणे, बोलतांना शब्द सांभाळून वापरणे हे तिने माझ्या वर खूप बिंबवले. जी परिस्थिती आहे तिच्या बद्दल तक्रार न करता, जे आहे त्या मध्ये adjust करून घेणे हे ती मला लहानपणापासुन शिकवत आलेली आहे.
माझं शिक्षण तिचं सर्वात मोठं ध्येय होतं. दोघे दादा अभ्यासात खूप हुशार होते. ते ८५-९० टक्यांच्या आसपास असायचे. मी खूप मेहनत करून पण माझी गाडी काही ७०-७५ च्या वर जायची नाही. माझ्या त्या टक्क्यांपेक्षा मावशीला माझ्या सतत माझ्या ३५ किलो वजनाची काळजी असायची. ती म्हणायची, तू पास होण्या इतका अभ्यास कर. आणि जाडी हो. competition च्या नावाखाली जे आज आपण मुलांवर लादतो. ते तिने माझ्या बरोबर केलं नाही. मग तिने मला जाड करायचे आतोनात प्रयत्न केले. मी आणि ऋती तिच्या कडे गेलो की जेवढा भात वाढायची. तेवढाच मोठा त्या भातावर तुपाचा गोळा असायचा. आत्ता वेळ बदलली. माझं वजन वाढलं. आत्ता तिला माझ्या वाढलेल्या वजनाची काळजी असते. आली की योगाचे अनेक प्रकार करून दाखवते. मी २-३ दिवस केले की परत 'जैसे थे' होऊन जाते. पण तिची तळमळ काही केल्या थांबत नाही.
आई अन्नपूर्णेचा वरदहस्त तिला लाभलेला आहे. त्यामुळे ती जो पदार्थाला बनवते, तो चविष्टच असतो. तिने एकदा येऊन माझ्या घरी अद्वित साठी लाडू बनवले. जास्तीचं तुप होतच. मग तिने त्याचं रसभरीत वर्णन केलं. अद्वित ने त्या दिवसापासून तीचं नाव 'लाडू आज्जी' ठेवलं आहे.
तिला मुलीची हौस होती. ती तिने माझ्या रूपात पूर्ण केलेली आहे. तिला जे करणं आयुष्यात शक्य झालं नाही, ते तिने मला करतांना बघितलं की ती समाधानाने भरून जाते. तिचे विचार खूप चांगले असले तरी तिला शब्द सापडत नाहीत. पण जेव्हा मी एखाद्या मोठ्या मंचावरून खाली उतरते, तेव्हा माझ्या बद्दल वाटणारा तिचा 'अभिमान' डोळ्यातलं पाणी बनवुन खाली उभी असते. माझं लिहणं तिला तिचं प्रतिबिंब वाटतं.



Comments
Post a Comment