पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : रोहिणी काकी
अत्यंत गोलाकार चेहरा, त्यातून अजून दोन गोल लावुन बनवल्या सारखे गोबरे गाल, या गोलाला शोभेल अशी गोलाकार टिकली, थोडा स्थूल बांधा, खुप साऱ्या जवाबदाऱ्या एकाचं वेळी पेलण्याची प्रचंड ताकद, अश्या काकी आहेत. मी बऱ्याचं वेळा चित्रांमध्ये खूप हात असलेली multitasking स्त्री बघते, तेव्हा मला रोहिणी काकींचा भास होऊन जातो.
मी लग्न करून लालबागला राहायला गेले तेव्हा, 'सासर' पेक्षा तिकडच्या 'कल्चर' मध्ये जमवुन घेणं माझ्या साठी आव्हान होतं. आत्तापर्यंत फ्लॅट मध्ये वाढल्यामुळे, स्वतःच्या जगात जगणारी होते. लालबागला आल्यानंतर अचानक खूप सारी माणसं घरात, दारांत आणि आजुबाजुला दिसायला लागली होती. आमच्या मजल्यावर सुमारे ३५-४० घरं होती. सगळ्यांना एकमेकांच्या घरातले, जवळचे - दूरचे नातेवाईक, मित्र मैत्रिणी माहीत असायचे. त्यातचं लालबागचे लोकं आपण आयुष्यात सण साजरे करून मज्जा करण्यासाठी जन्माला आलेले आहोत, असे असतात. एकमेकांच्या घरात यायला जायला कोणाला कोणाची permission लागत नाही. त्याच मजल्यावर १-२ जाच करणाऱ्या म्हाताऱ्या. सुनेने कसं राहायचं, हिरव्या बांगड्या घातल्याचं पाहिजेत, टिकली कुठे आहे हे शिकवायला घरी यायच्या. आई अण्णा महिन्यातले २०-२२ दिवस टूर वर असायचे. त्यातचं, माझं पाककौशल्य चहा आणि चपाती इतकचं प्रगत होतं. तेव्हा या सगळ्या अजब गजब जगात आपला निभाव लागणं कठीण आहे, असं मला उमगायच्या आधी रोहिणी काकींनी मला सांभाळुन घ्यायला सुरवात केलेली होती. फ्लॅट मधली मुलगी लालबागची मुलगी महिनाभर पण टिकणार नाही, असं सगळ्यांना वाटतं असतांना, मी जर साडे तीन वर्ष लालबागला राहु शकले. तर पाहिलं कारण होतं, आई - अण्णा. आणि दुसरं कारण होत - रोहिणी काकी.
रोहिणी काकी आमच्या मजल्यावर ३ घर सोडुन राहायच्या. त्यांच्या स्वतःच्या घरात डझनभर माणसे होती... वेगवेगळ्या वयाची, आकाराची आणि स्वभावाची. या कुटूंबाला सामावुन घेणाऱ्या समोरासमोरच्या २ खोल्या काकींच्या होत्या. पण रोहिणी काकींच्या प्रेमाचं राज्य आख्या मजल्यावर होत. त्या मजल्यावरच्या प्रत्येक घराच्या आणीबाणीला काकी उभ्या राहायच्या. पण आपण काही विशेष करतं आहोत, हा आविर्भाव काकींनी कधीच आणला नाही.
त्या मजल्यावर जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला काकी मालिश करून आंघोळ घालायच्या. ते बाळ थोडं मोठं झालं कि ते स्वतःच्या घरी न सापडता काकींच्या घरी सापडायचं. आणि हे पिढ्यानपिढ्या चालू असावं. एकदा लहानपणी, संदेशाला - राजू दादा आणि मीना ताईंनी खूप चिडवलं. आणि सांगितलं की, तू आमचा भाऊ नाहीस तू आम्हाला सापडला होता. मग त्याने घर सोडून जायचं ठरवलं. बॅग भरली आणि तो रोहिणी काकींकडे रहायला गेला. रात्रभर राहून महाराज दुसऱ्या दिवशी घरी परत आले.
माझं नवीनचं लग्न झालेलं, आई टूर वर गेलेल्या. मला काही केल्या साखर सापडेना. मी काकींकडे गेले. काकींनी घरात येऊन अचूक डब्बा दाखवला. आमच्या घरातला खडानखडा काकींना माहित असायचा. माझ्या घरी पाहुणे आले की, जो पर्यंत मी विचार करायचे की काय बनवु ?? तो पर्यंत काकी साबुदाणा वडे,चटणी घेऊन हजर व्हायच्या. काकींच्या स्वतःच्या घरात इतकी माणसं असतांना सगळं चुटकी सरशी आवरल्या सारख्या काकी असायच्या. इतकं करून मी त्यांना थकलेलं बघितलं नाही. चिडलेलं बघितलं नाही. आपण दुसऱ्यांसाठी करतोय तेव्हा कोणतंही उपकार केल्याची जाणीव नाही. 'करणं' स्वभावाचा भाग आहे असं काकी करतं होत्या.
दिल्ली वरून दीड - दोन महिन्यांनी परत येतांना मी विचार करतं होते, की घरी जाऊन घर खूप आवरावं लागेल, मग जेवण बनवावं लागेल. मी घरत एन्ट्री केली तर घर एकदम झाडून पुसून स्वच्छ. पाणी भरून ठेवलेलं. आणि फ्रेश होऊन बसे पर्यंत काकींनी जेवणाची ताट आणून ठेवलेली होती. अन्नपूर्णा देवीने स्पेशल आशीर्वाद दिल्यासारख्या काकी आहेत. त्यांनी कोणत्याही पदार्थाला स्पर्श करावा आणि पदार्थाने रुचकर बनून जावं! माझ्या सारख्या अजिबात foodie नसलेल्या व्यक्तीला चवीने खायला आणि बनवायला काकींनी शिकवलं आहे. सेवा त्यांच्या मध्ये मुरलेली आहे की त्या सेवेमध्ये मुरलेल्या आहेत, हे सांगणे कठीण आहे.
एकदा एक सासुरवाशीण काकींना सासू कशी वाईट आहे वगैरे सांगत होती. काकी म्हणाल्या की, जेव्हा (सासू-सासरे) असतात तेव्हा वाटतं त्रास आहे. पण आज माझे सासु सासरे आहेत का? दिवस निघून जातात. काकींनी कोण चूक कोण बरोबर असा न्याय निवाडा करतं बसण्यापेक्षा, तिचा प्रॉब्लेम सोपा करून टाकला होता. छोट्यांपासुन मोठ्यानं पर्यंत काकी सगळ्यांसाठी होत्या. त्या मजल्यावर कोणाला डिलिव्हरी ला जायचंय, काकी जातील. कोणाला जखम होऊन ड्रेसिंग करायचीय, काकी करतील. कोणी अंथरुणावर खिळलेलं आहे, काकी मदत करतील. कोणाला गाण्यासाठी, नाचण्यासाठी पार्टनर हवाय? काकी आहेत. त्या मजल्यावरचे सगळे आपलेच आहेत, असं समजुन काकी खूप सहज सगळं करतं होत्या.
गेले अनेक दिवस lockdown मध्ये फक्त ३ माणसांचं कुटुंब असताना माझी बरीच धावपळ झाली, काकी इतक्या सगळ्यांचं कसं करतं होत्या कोणास ठाऊक. कदाचित गुरुचरणी त्यांनी ठेवलेल्या सेवा भावनेने त्यांना ही ताकत दिली असावी.
गेले काही महिने धर्म, घरगुती हिंसा, रंगभेद अश्या अनेक भिंती मनात उभ्या आणि वाढतं असल्याचं दिसतं आहे. सत्गुरू बाबाजींनी जे world without walls बनुन सगळ्यांना आचरणात आणायला सांगितलं होतं, ते करतांना मी काकींना बघितलं. त्या मजल्यावरच्या घरांमधल्या आणि मनांमधल्या भिंती पडून काकींनी सगळ्यांना प्रेमाने आणि सेवेने आपलंसं केलं होतं. त्यांच्यासाठी त्या सगळ्या मजल्यावरच्या भिंती नष्ट होऊन, एकचं कुटुंब राहत होतं. आज बिल्डिंग renewation ला गेलीय , तो मजलाही नाहीये. पण काकी जिथे पण राहतील, तिकडे प्रेमाची नदी वाहत राहील!


Comments
Post a Comment