दिव्यत्वाची येथे प्रचिती ..

एखादी नियमबाह्य गोष्ट अकस्मात घडली की, ती जादु किंवा चमत्कार वाटू लागते. पण खऱ्या अर्थाने आयुष्यात अश्या अनेक गोष्टी क्षणाक्षणाला, आजू बाजुला माझ्या बरोबर पण घडत आहेत. ज्यांचा हिशोब मी ठेवला नाही म्हणून त्या लक्षात राहिल्या नाहीत. 

गेली काही वर्ष मला अस्थम्याचा त्रास होतो. एक एक श्वास घेणं जड होऊ लागतं. पण त्या आधी आणि आत्ता पर्यंत अनेक श्वास मी खूप सहज घेतले आणि सोडले आहेत. जर माझ्या साध्या श्वासांवर पण माझा कंट्रोल नसेल, तर माझा प्रत्येक श्वास चमत्कारचं तर आहे. 

माझ्या खिडकी मधुन मी नेहमी एक झाड बघते. त्याची पानगळ होते. पाऊस पडला की त्याला पालवी फुटते. काल पर्यंत शुष्क वाटणारं  झाड, जीवनदायी होऊन जातं. त्या झाडावर पक्षांनी आत्ता घरटं पण बांधलं आहे. या झाडाच्या फांदीवर विश्वास ठेऊन पक्षी आपलं आख्ख घर वसवतं आहेत. खरं तर हे झाडं काल पर्यंत शुष्क, आणि मरणाच्या दारात उभं असल्या सारखं वाटतं असतांना, ते अचानक जगायला लागलं. आणि दुसऱ्यांच्या जगण्याचं कारण पण बनलं. निसर्गाची ही निर्मिती युगानुयुगे चालू आहे. फक्त माझं त्याकडे लक्ष गेलं नाही. पण डोळे उघडुन बघितलं तर, हा चमत्कारचं आहे. 

रोज पक्षी नावाचे इवलेसे जीव दाणे गोळा करत घिरट्या घालतं राहतात.( हल्ली घरटी बांधण्यासाठी माझ्या खिडकी मधल्या झाडुच्या काड्या, गुपचुप नेतांना मी आणि अदवित ने त्यांना अनेक वेळा पहिले आहे ). ज्या कुटुंबाच्या पोटासाठी आणि छतासाठी माणूस म्हणुन माझं अवघ आयुष्य कामी लावते, ते काम ते छोटेसे पक्षी करतचं  आहेत. हे सृष्टीचं सृजन माझ्यासाठी चमत्कारचं आहे. 

डोळ्यासमोर पाऊस पडायच्या आधी आणि नंतर निसर्ग आपले रंग बदलुन टाकतो. काल पर्यंत गरम वाटणारी हवा अचानक सुखदायी वाटू लागते. अलार्म क्लॉक शिवाय सूर्य उगवतोय. चंद्राच्या अमावस्या, पौर्णिमा सगळं सुरळीत चालू आहे. 

इतकंच काय पण माझ्या घरात एक मुल जन्माला आलं. मी ९ महिने त्याला कोणताही आकार दिला नाही. तरी हाथ, पाय, नाक सगळं जागच्या जागी घेऊन तो जन्माला आला. वेळेनुसार चालायला बोलायला लागला, हे सगळं आपोआप होतंय... हे 'आपोआप' होणं माझ्या साठी विलक्षण आहे. 

चमत्कार आणि साक्षात्कार या मध्ये एक केसाइतका फरक आहे. चमत्कार मला कल्पनेच्या पलीकडल्या गोष्टी दाखवतो. साक्षात्कार मला मी आजपर्यंत न बघितलेल्या पण अस्तित्वात असलेल्या गोष्टीची जाणीव करून देतो ! 



Comments

  1. प्रचिती होण आणि ती इतरांना ही करून देणं. हा सुद्धा एक साक्षात्कार च आहे.... माझ्यासाठी तरी... या लेखा नंतर माझ्या आयुष्यात जे काही चमत्कार होतील त्यांना मी साक्षात्कार च समजेन🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ये इश्क, मुझे इश्क है तुमसे..

Radheshyam Ji Shraddhanjali

Satguru Babaji