पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : पदमा मावशी

कबीर बाय अबिदा च्या introdution मध्ये गुलजार साहेब म्हणतात, सुफियो संतो के यहाँ मौत का तस्सवुर बडे खुबसुरत रूप लेता है। झुम उठते है, जी उठते है। तरह तरह से अंत आनंद की बात करते है।
पदमा मावशी हे माझ्या (आणि माझ्या सारख्या अनेकांच्या) आयुष्यातलं एक सुरेल पर्व आहे. (मी या व्यक्ती वर खरं तर एक पुस्तक लिहू शकते ) मी ४-५ वर्षाची असतांना मुंबई मध्ये आले आणि बुधवारच्या, तिच्या घरी होणाऱ्या सत्संग मध्ये पदमा मावशी मला भेटली. आणि आयुष्यभर पुरेल अशी friend, philosopher and guide झाली. खूप सुंदर नव्हती पण तेजस्वी होती. सावळी होती, पण बोलकी होती. आणि बोलणं कोणालाही काही क्षणांत आपलं बनवुन टाकेल असं! तिच्या घरी खूप मेहफिली रंगल्या. ती गायला लागली की तिच्या सुरांबरोबर एका वेगळ्या जगात घेऊन जायची. तिने गायलेली गाणी मी दुसऱ्या कोणत्याही कसलेल्या गायिकेकडुन ऐकली तरी, त्यांना मावशीच्या गाण्याची सर येत नाही. तिचं गाणं आत्म्यांपासून निघायचं आणि म्हणून ते भिडायचं. तिचं- माझं नातं रक्ताचं नव्हतं पण आत्म्याचं आणि आत्मीयतेचं होतं. मावशीने गाण्याबरोबर खूप प्रेम दिल. तिने जर तिच्या मुलांना दिवाळीला कपडे घेतले तर मला पण घेतले. तिच्या घरून मी कधी उपाशी किंवा न खाता आले नाही. आमच्या घरातलं प्रत्येक सेलेब्रेशन मावशीच्या गाण्याशिवाय अपूर्ण होतं. वाढदिवस, लग्न, साखरपुडा, कोणाचं येणं.. सगळ्याची मावशीने मेहफिल केली. नुसतं तिच्या बरोबर बसणं पण मेहफिल होती.
One रूम kitchen च तिसऱ्या मजल्या वरचं घर. पण या छोट्याश्या घरात माणसं सामावण्याची प्रचंड ताकत मावशी आणि काकांनी मिळून भरली होती. त्या घरात स्वागत जितक्या प्रेमाने व्हायचं तितका तिकडचा निरोपही अगत्याचा. मावशी काका तिसऱ्या मजल्या वरच्या गॅलरी मध्ये उभे राहायचे. जाणारी वक्ती दिसेनाशी होई पर्यंत हात हलवत निरोप देण्यात यायचा.
काका आणि मावशीनी कमालीच्या विषम परिस्थिती मध्ये सुंदर संसार केला. मावशी पोष्टात नोकरीला होती. काकांची नोकरी काही वर्षांनी सुटली. मावशी सकाळी ७ वाजता घरातून ऑफिसला निघायची. काका सगळं घर सांभाळायचे. जेवण बनवण्या पासुन ते भांडी घासण्या पर्यंत सगळी काम करतांना मी काकांना पाहिलं. पण त्या दोघांना एकमेकांच्या कामाचा खुप आदर होता. तिने पैसे कमावण्याची ऐट मिरवली नाही. काकांनी घरातल्या कामांना कमीपणा मानलं नाही. ते दोघे एकमेकांना बॅलन्स करत राहिले. ते नुसतेच जगले नाहीत त्यांनी जे काही होत, त्यात जीवन सेलेब्रेट केलं .
नीटनेटकेपणा स्वच्छता यांची मावशीला प्रचंड आवड. मीठ धुवुन भाजीत टाकणारी ती एकटीच पहिलीये मी आजपर्यंत! एकदा तर मी खाल्लेला चिकु तिने माझ्या तोंडामधून काढुन घेतला होता. चिकु धुतलेला नव्हता म्हणुन..पाणी पुरी तर तिने मला कधीच खाऊ दिली नाही.
सासुवर आणि सगळ्या सासरच्यांवर प्रेम करणं शक्य असतं हे तिने मला दाखवलं. एकदा तिच्या सासुबाई नाशिक वरून आल्या आणि त्यांना ड्राइवर ने चुकीच्या बस स्टॉप वर उतरवलं. मग त्या बराच लांबचा पल्ला चालत आल्या. मी मावशी च्या घरी पोहचले तर मावशी त्यांच्या पायाला तेल लावत होती. तिच्या सासूबाईंनी एका उशीच्या कव्हर वर सुंदर embroidery केली होती. ती तिच्या सासूबाईंनी केली हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर कमालीचं कौतुक असायचं. मी तिच्या बरोबर तासं तास गप्पा मारल्या आहेत. पण मी कधीच तिच्या कडुन कोणा बदद्ल वाईट ऐकलं नाही. तिला सगळे आवडत होते आणि ती सगळ्यांना आवडत होती.
मी नववी-दहावी मध्ये असतांना लिहायला लागले. तिला माझ्या प्रत्येक ओळीच कौतुक. माझे कोणतेही प्रॉब्लेम्स जर तिच्या कडे मी घेऊन गेले तर आध्यात्मिकता आणि सतगुरू चा आधार घेऊन तीने मला solve करायला शिकवलं.
या वर्षांमध्ये एक गोष्ट कायम होती, आमचं खूप बोलणं. बिट्टू दादा (तिचा मुलगा) चे लहानपणीचे किस्से तिला खूप रंगवून सांगता यायचे. आम्ही दोघी पोटात दुःखेपर्यन्त हसलोय. डोळ्यात पाणी येई पर्यंत.. गाल दुखेपर्यंत हसलोय...
पण एके दिवशी एक कॉल आला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. पदमा मावशीला कॅन्सर झालाय.. मी ऑफिस मधुन हॉस्पिटल मध्ये पोहचली.. तर ती नेहमी सारखीच एकदम मज्जेत. मावशी भेटायला येणाऱ्या सगळ्यांना समजावत होती की,फार काही झालं नाहीये. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग तिने ताईला मला अँपल द्यायला सांगितलं. मग म्हणाली,''जास्त काही झालं नाहीये, लेकराची उगीच धावपळ झाली.'' मी अँपल चे २ घास खाल्ले. तेव्हढ्यात तिने ताईला अँपल धुतलं होत का विचारलं. नशीब! ताई 'हो' म्ह`णाली. नाहीतर मावशीने अँपल पण तोंडातून बाहेर काढलं असतं.. रिपोर्ट्स नुसार मावशीची लास्ट स्टेज होती. डॉक्टर्स च म्हणणं होतं की, फार फार तर २ महिने राहतील chemotherapy तुम्ही तुमच्या रिस्क वर करा. patient विथ or without ट्रीटमेंट जाणारच आहे. आम्ही सत्गुरू बाबाजींचा आशीर्वाद घेऊन ट्रीटमेंट सुरु केली, आणि दातारच्या कृपेने मावशींच्या सहवासाचे ४ वर्ष, आम्हाला बोनस म्हणून मिळाले.
यादरम्यान आम्हाला एकदा सत्गुरू बाबाजींच्या दर्शनाचा योग आला. मला मावशी म्हणाली, मला सत्गुरुंशी शब्दात बोलता नाही येणार तू माझ्या तर्फे बोल. मी विचारलं की काय सांगू?? मला वाटलं ती कॅन्सर च्या ट्रीटमेंट बद्दल बोलेल. पण ती thank you satguru for everything म्हणाली. आध्यात्मिकता जीवनातली परिस्थिती नाही बदलत, मनस्थिती बदलते. हे मी मावशी मध्ये बघितलं. ती प्रत्येक क्षणी समाधानी होती. आनंदी होती. मी एकदा तिला विचारलं chemotherapy कशी असते ग? तुला खूप त्रास होतो का?? तर ती म्हणाली की काही खास नाही.. सलाईन सारखं असत आणि माझ्या बाजूच्या बेड वर एक संगीताच्या शिक्षिका असतात. आम्ही दोघी मिळून मस्त अभंग म्हणतो. तिला प्रत्येक क्षण साजरा करता येत होता. तिने तिची chemotheraphy पण साजरी केली.
मी तिला एक कविता लिहुन प्रिंट करून दिली होती. ती तिने मस्त लॅमिनेट करून बेड जवळ लावली होती. कोणी तिला कोणतही गिफ्ट दिलं तर ती त्या वस्तूला जीवापाड सांभाळायची. एखादं फुल दिलं, तर पाण्यात ठेवुन त्याला जमेल तेव्हड जपायची.

तिच्या घराला एक खिडकी होती. घरी येणारा व्यक्ती, त्या खिडकी मधुन आधी दिसायचा मग दार उघडलं जायचं. मी जेव्हा पण तिला भेटायला जायचे, ती आधी मला त्या खिडकी मधून बघायची. मग एक मोठं smile. आणि म्हणायची '' माझं सोनं आलं ग!''
तिला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला तिने हसवुन परत पाठवलं. तिच्या शरीराला होणार त्रास तिने चेहऱ्यावर आणला नाही. मध्ये बरेच महिने मी मावशी बरोबर फोनवरच बोलत होते. घरी गेलेच नव्हते. मग तिनेच एके दिवशी घरी बोलावुन घेतलं. आवाज क्षीण झालेला होता, पण तरी एक दोन जोक्स मारले. मग म्हणाली, ''तुला आठवत का ग? आपण सत्गुरुंच्या दर्शनाला गेलेलो तेव्हा तू माझ्या तर्फे काय म्हणाली होतीस??'' मी म्हणाले,'' thank you for everything.'' मावशी ने मला त्या दिवशी जवळ घेऊन सांगितलं की, मी जीवन खूप आनंदात घालवलंय. शेवटी थोडासा दुःख आलं म्हणून मी complaint का करू? आज नंतर माझ्यासाठी आणि स्वतःसाठी सतगुरूला फक्त इतकंच म्हणशील.. thank you for everything. तीच जाणं मला कधीच सहन झालं नसतं. पण ती माझ्या मनाची पूर्ण तयारी करून गेली. देणं तिच्या स्वभावाचा भाग होता. ती septemebr मध्ये गेली, पण november मधल्या माझ्या बर्थडे च गिफ्ट आधीच ठेऊन गेली. मावशी त्या दिवशी तिच्या कडुन ऐकलेल्या त्या गाण्या सारखी होतीस.. ''आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा । पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा ''
तिच्या एका बाजूच्या भिंतीवर मी लिहिलेली कविता, दुसऱ्या बाजूच्या टेबल वर मी बनवलेलं ग्रिटींग आणि समोर लॅपटॉप वर तिच्या साठी बनवलेली documentary... स्वतः बघत आणि सगळ्यांना दाखवत मावशी गेली. मी बनवलेल्या सगळ्या गोष्टींची किंमत वाढवली तिने. मला श्रीमंत केलं.
मावशी मला सत्गुरू ने दिलेलं बेस्ट गिफ्ट होतं. जगणं सेलेब्रेट करणारे मी खूप पाहिलेत, मरण सेलेब्रेट करणारी ती एकटीच होती.

Comments

  1. Amruta ji thank you for everything....

    ReplyDelete
  2. धन निरंकार जी
    खूप खूप सुंदर लेख होता, पद्मा मावशींचा आम्हाला दर्शन झालं नव्हतं परंतु तुमच्या या लेखाद्वारे त्यांना भेटल्यासारखं वाटलं .
    सद्गुरु माताजी कृपा करो अशाच सात्विक संतांचा संग निरंतर मिळत राहो.
    थँक्स फॉर एव्हरीथिंग हा मेसेज नक्कीच मिळाला.

    धन्यवाद अमृता जी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ये इश्क, मुझे इश्क है तुमसे..

Radheshyam Ji Shraddhanjali

Satguru Babaji