पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : इक्बाल मामा
मी माझ्या लहानपणीची, पहिली ४-५ वर्ष नाशिक मधल्या एकलहरे नावाच्या सुरेख ठिकाणी घालवली आहेत. औष्णिक विद्युत केंद्र असल्याने engineers ना राहण्यासाठी ही कॉलनी वसवली गेली होती. तिथे एक मार्केट बिल्डिंग होती. त्यात पहिल्या मजल्या वर माझ्या आजीची खानावळ होती. फॅमिली त्या खाणावळीतच राहायची. जेवायला येणारे, सगे सोयरे, नातेवाईक यामुळे घर नेहमीच भरलेलं असायचं. त्यातच इक्बाल मामाचं माझ्या सख्या मामा चा मित्र म्हणून घरी येण जाण होतं. खाली सगळं मार्केट! सगळे मार्केट वाले, दुकान वाले, भाजी वाले ओळखीचे. (आज मुंबई मधल्या फ्लॅट मध्ये जिथे कोणीच कोणाला फारसं ओळखत नाही, तिथे ही गोष्ट मला विशेष वाटते). त्या सगळ्या मार्केट मध्ये माझी एक favourite जागा होती. आमच्या बिल्डिंग च्या exact समोरची - इक्बाल बेकारी अँड जनरल स्टोर. आणि हे दुकान होतं आपल्या इक्बाल मामाचं. त्याच्या काउंटर वर ८-१० स्वच्छ बरण्या. त्या मध्ये रंगीत लिम्लेट च्या गोळ्या, चौकोनी आणि छोटी बटण बिस्किटं. थोड्या मोठ्या बरण्यां मध्ये मेलडी चोकोलेट्स. (मी कदाचित या दुकानात इतके मेलोडी खाल्ले आहेत की, आज पण जर मला कुठेही मेलोडी दिसलं तर बॅकग्राऊंडला इक्बाल मामाच्या बेकरी मधल्या बरण्या डोळ्या समोर चमकुन जातात ) मी गेले की मामा सहज त्यातून चोकोलेट्स काढून द्यायचा. मला हे दुकान अलीबाबाला सापडलेल्या गुहे सारखं वाटायचं.
कोणी पाहुणे आलेच आणि त्यांनी खाऊ घेऊन द्यायचं ठरवलं तर हे दुकान एकदम समोरच. या दुकानाच्या समोर एक छोटा कट्टा होता. वर चढून जायला १ पायरी. तिथे आम्ही दुपारचे खेळायचो. कधी कधी संध्याकाळी सुध्दा. पण तिकडून कोणी कधीच आम्हाला हुसकावून लावल नाही. दुसरं विशेष म्हणजे इक्बाल मामालाच आम्ही तिकडे आलेलं खूप आवडायचं. विशेषतः मामाला माझ्याशी गप्पा मारायला आवडायचं. मी नुकतेच भोपे बाईंच्या बालवाडीत जात असल्याने तिथे शिकलेल्या कविता आणि गोष्टी बोलत असेन कदाचित. पण इक्बाल मामाचा आणि माझा फुल्ल timepass होता तो. मला त्याची इतकी सवय झालेली कि जिना उतरून खाली येतांना मध्ये एक जाळी होती तिथून मी आधी मामा दिसतो का ते बघायचे, आणि तो मरून कलर चा शर्ट घालून मला जसा च्या तसा आठवतो. मी खूप बडबडी असल्यामुळे खानावळीत येणार सगळे उचलून घ्यायचे, लाड करायचे. पण मला इक्बाल मामाने केलेले लाड मला विशेष लक्षात राहिले.
मग माझं एकलहरे हळूहळू सुटलं. इक्बाल मामा आठवणीत होता पण कॉन्टॅक्ट मध्ये नाही. मग अचानक जवळजवळ २०-२२ वर्षांनी इक्बाल मामा मला माझ्या मामेभावाच्या लग्नात भेटला. तेव्हा माझं नुकतंच लग्न ठरलेलं. पण मामा मला मी पुन्हा ४-५ वर्षीचीच असल्या सारखा भेटला. मग नंबर मिळाला. वॉट्स अँप चालू आहे. त्याने खूप वेळा घरी यायचं आमंत्रण केलं. पण जाणं काही झालंच नाही. मग मागच्या वर्षी फुरसत मध्ये नाशिकला गेले तर इक्बाल मला कडे जायचं ठरलं. मामी ने आनंदाने स्वागत केलं. मामी पहिल्यांदाच भेटली होती.म्हणाली की, ''तुम्हारे बचपन के फोटोस है घरपे, ये हमेशा देखते रहते है.'' अश्या प्रकारे इक्बाल मामाने माझं लहानपण जपून ठेवलेलं आहे. मामी हिंदी मध्ये बोलली तरी मामाला शुद्ध मराठी येतं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ते भावपूर्ण श्रद्धांजली सगळं मराठी मध्ये बोलता, लिहिता आणि वॉट्स अँप वर type पण करता येतं.
मी त्या दिवशी मामाच्या घरातुन निघाले तेव्हा त्याने हजार रुपयांची नोट माझ्या हातात जवळजवळ कोंबलीच. मी नाही म्हणत असतांनाही त्याने ऐकलंच नाही. म्हणाला, माझी मुलगी आणि नातु पहिल्यांदा घरी आलेत, रिकाम्या हातांनी कसं पाठवु?
इक्बाल मामा ला २ मुलं आहेत पण मुलगी म्हणुन त्याने मला खुप जीव लावलेला आहे. काही दिवसांपूर्वी मी वॉट्स अँप वर त्याचा स्टेटस बघितला. त्यामध्ये स्वतःच्या मुलांचे, भावा- बहिणीच्या मुलांचे, नातवंडांचे फोटोस होते. त्यात त्याचा आणि माझा एक लहानपणीचा फोटो होता. त्याच्या फेसबुक प्रोफिल मध्ये मी नवरी असतानाचा फोटो. त्या फोटोला एकही like वर comments नाही. कशी असेल? त्याच्या जगात अमृता कोण आहे, कोणालाच माहित नसावं, पण त्याचा भारी जीव माझ्यावर! त्याचा आपलेपणा मला सारखा जाणवत राहतो.
इक्बाल मामा ईद जितक्या आनंदाने साजरी करतो तितक्याच उत्साहात तो दिवाळीला पण असतो. तो आनंद घेतो आणि आनंद देतो. टिक टोक वर पण असतो.
एकीकडे कोरोना ने जग पोखरून काढलं. डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार सगळ्यांचे आभार मानले गेले, आणि मानले गेलेच पाहिजेत.
गेली अनेक वर्षे इक्बाल मामा fire ब्रिगेड मध्ये काम करतोय. त्यातचं मागच्या आठवड्यात नाशिक मध्ये १५० झोपड्याना भीषण आग लागली. सिलेंडरचा स्फोट झाला होता. झोपड्या जवळजवळ असल्याने आग लागल्यावरही असे स्फोट अजून होण्याची शक्यता जास्त होती. फिरब्रिगेडच्या सगळ्या टीमसाठी जोखीम होती. पण ही जोखीम त्याने त्याच्या टीम ला लीड करून पेलली. इक्बाल मामाने त्याच्या टीम बरोबर जाऊन आग विझवली. कितीतरी जीव वाचवले.
Social मीडिया वर वेगवेगळ्या आगी already लावल्या आणि वाढवल्या जात आहेत. त्यावर पाणी टाकून मामाने गेली अनेक वर्ष दोन गोष्टी मला शिकवल्या आहेत. पहिली म्हणजे, माणसं जोडावी आणि टिकवुन ठेवावी. दुसरं म्हणजे माणुसकीचं नातं कोणत्याही धर्मा पेक्षा मोठं असतं!


Comments
Post a Comment