पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : गोपीराज मामा


स्थळ : माझं आवडतं एकलहरे, मार्केट बिल्डिंग, पहिला मजला, माझ्या आज्जीची गजबजलेली खानावळ. जेवणारे, जेवण बनवणारे, वाढणारे, यांच्या सोबत मित्र परिवार, नातेवाईक सगळ्यांचा राबता होता. त्यात एक गोपीराज मामा होता. मम्मीचा चुलत भाऊ. मध्यम बांधा, ऊंची बेताची, शर्टाची इन् आयुष्यात कधीच केलेली नसावी, विरळ मिशी, चेहऱ्यावर मिश्किलतेची छटा. सायकलवर बसुन यायचा तेव्हा, हॅन्डल च्या दोन्ही बाजूंना खानावळीच्या डब्ब्यांच्या पिशव्या अडकवलेल्या असायच्या. गोपीराज मामा आजीच्या खानावळीचे डब्बे पोहचवायचा. त्याच्या मराठी भाषेला अहिराणीचं वळण होतं. तो जिथे उभा राहायचा, तिथे हशा पिकायचा.
एकदा आम्ही ढोकळे खात होतो. तर मामा म्हणाला की, ''कमी खा, नाही तर उद्या ठोकळे बाहेर येथील.'' एकदा आमचे आजोबा वारले म्हणून सगळ्या मामांनी टक्कल केले होते. २-३ दिवसात सगळ्याच्या टकलांवर थोडी थोडे केस दिसु लागले. मामाने तेव्हा 'सगळ्यांच्या डोक्यावर बाजरीच्या भाकरी थापल्या सारख्या वाटतं' असं म्हणुन सगळ्यांना हसवलं होतं.
मामा मजेशीर होता. मज्जेमज्जेत त्याला २ मुलं आणि २ मुली झाल्या. सगळ्यात छोटा विवेक वर्ष भराचा असतांना मामी गेली. मग परिवारामध्ये नवी मामी आली आणि अजून एका भावंडाची भर पडली. इतक्या मोठ्या उलाढालीत मामा तसाच होता.. .मिश्किल! तो गरीब होता पण केविलवाणा नव्हता. सख्खा नव्हता पण आपला होता.
दरवर्षी सुट्यांमध्ये नाशिक ला गेले की मामा एक दिवस त्याच्या घरी जेवायला घेऊन जायचा. त्याच स्वतःच घर नव्हतंच. भाड्याने ११ महिन्यांच्या कराराने तो वेगळ्या घरात राहायला जायचा. मग प्रत्येक सुट्यांमध्ये आम्ही मामाच्या नव्या घरी जेवायला जायचो. एकदा मी आणि तुषार (माझा मामेभाऊ) गोपीराज मामाच्या घरी जेवायला निघालो. ६-७ वर्षाचे असु. दळणवळणाचं साधन म्हणजे, 'मामाची सायकल'. सायकलवर बसायला २ जागा होत्या. एक म्हणजे सायकलची दांडी आणि दुसरी म्हणजे सायकलची कॅरीयर. माझा पाय एकदा मागे सायकलच्या चाकात गेलेला, त्या धास्तीने मी दांडीवर बसायला तयार झाले. तुषार मागे कॅरियर वर बसला. मामाने सायकल चालवायला सुरवात केली. पण या वेळी मामाने घर इतक्या दुर घेतलं होत की, रास्ता काही केल्या संपेना. दांडी वर बसणं अशक्य झाल्यावर मी कॅरियर वर बसते, असं मी मामाला सांगितलं. मग, मामाने सायकल थांबवली, सीटच्या अदलाबदली झाल्या. तरी मामाचं घर काही केल्या येईना. ''जवळचं आलोय'' असं मामा सांगत राहिला. एका बाजूला पाय टाकुन बसवेना.. मग परत एकदा मामाला सांगून सायकल थांबवली. दोन्ही बाजुला पाय टाकुन नव्या पोझ मध्ये सायकल चालू झाली. मामाने नेमकं या वेळी कोणत्या कोपऱ्यात घर घेतलयं, हे काही कळतं नव्हतं. शेवटी एकदाचं मामाचं घर आलं. आतुन काही बघण्या सारखं नसायचं. एक जमिनीवरच ठेवलेली गॅस शेगडी, भांड्यांची मांडणी, त्यावर लख्ख घासलेली भांडी, एक हंडा कळशी. एक लोखंडाचा पलंग. याखेरीज त्या घरात काहीच नसायचं. पण मामा मामी ज्या जिव्हाळ्याने जेवायला घालायचे, त्याची सर आजच्या ५ स्टार हॉटेलातल्या जेवणाला नाही. त्या दिवशी मी मामाच्या घरच्या उंबरठ्यावर बसुन जगातील सगळ्यात सुंदर landscape पहिला आहे. शेत, त्यामध्ये एक विहीर, आजूबाजूला रांगेत झाडं. आणि सगळ्या झाडांनी असंख्य सुगरण पक्षांच्या खोप्यांना आश्रय दिलेला. आणि त्या खोप्यांचं विहिरीच्या पाण्यात पडलेलं प्रतिबिंब आजही माझ्या डोळ्या समोर जसच्या तसं उभं आहे.
पुढच्या वर्षी मामाने परत जेवायला बोलावले. मागच्या वर्षीचा प्रवास लक्षात राहिल्याने मी, ''घर किती दूर आहे हे आधी विचारलं?'' ''जवळचं आहे, संध्याकाळी जाऊ'' असं सांगून मामा गेला. आणि ठरल्या प्रमाणे मामा आणि त्याची सायकल आली. मी परत पुढच्या दांडीवर बसले. गजबजलेला ररस्ता मागे पडला. आत्ता ज्या रस्त्याने आम्ही जात होतो, तो ओळखीचा तर होता. पण रात्री मी कधीच त्या रस्त्याने गेले नव्हते. त्या रस्त्यावर पाण्याची एक टाकी होती. तिच्या समोर एक मजल्याची ओसाड बिल्डिंग होती. त्या बिल्डिंग मधल्या सगळ्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या होत्या. त्या पाण्याच्या टाकी वरून उडी मारून एका मुलाने आत्महत्या केली आहे आणि त्याचं भुत समोरच्या बिल्डिंग च्या काचा फोडतं असं सगळे म्हणायचे. ( सगळे म्हणजे कोण होते? भूत काचा का फोडत होतं? खरं होतं की खोटं होतं ? हे समजण्याचं ते वय नसावं) दिवसा त्या रस्त्याने जातांना फुटलेल्या खिडक्या मी अनेक वेळा बघितलेल्या होत्या. त्यामुळे त्या टाकी खालून जातांना नकळत माझ्या हृदयाची धडधड वाढून जायची. आणि आत्ता तर मामा रात्रीच्या वेळी त्या टाकी खालून नेत होता. दोन्ही बाजूला दाट अंधार. मी जीव मुठीत घेऊन सायकलच्या दांडीवर बसले होते. अचानक माझी बडबड बंद होऊन, मी डोळे बंद केल्याचे मामाच्या लक्षात आले असावे. त्याने 'भूत वगैरे काही नसतं' इतकचं सांगितलं. आणि सायकल चालवत राहिला. भूत आलं तरी आपल्याला दिसू नये, म्हणून मी काही डोळे उघडले नाहीत. मामा म्हणाला,''तुला आत्ता एक गंमत दिसणार आहे. बघ'' मी डोळे उघडले तर मामा मला भुतांच्या राज्यातून चक्क पऱ्यांच्या जगात घेऊन आलेला होता. त्या मिट्ट काळोखात डोळ्यात सामावत येणार नाहीत इतके काजवे! हजारो दिवे चालू बंद होत माझ्यासाठी जादू करत होते. त्या रस्त्यावर काजव्यांचा धूसर प्रकाश पसरला होता. आणि मी तरंगत त्या मधून जात होते. मी अगणित काजवे डोळ्यात साठवण्याचा एक अनोखा अनुभव त्या रात्री मामामुळे घेतला आहे.
काही वर्षांनी मामा ऐन दिवाळीत गेला. मला दिवाळीच्या असंख्य पणत्यांच्या ज्योतींमध्ये मामाने दाखवलेले काजवे आठवतात. त्याच्या बहिणींना भाऊबीजेला हक्काने साड्या घेणारा भाऊ आठवुन जातो. आपल्याकडे श्रीमंती असतांना कोणीही देईल. पण माझ्या गरीब मामाचं मन श्रीमंत होतं. तो स्वतः ज्या परिस्थिती मधून जगत होता, त्याची धग त्याने नात्यांना लागू दिली नाही. मामा मला हे नक्की शिकवून गेलाय की, आनंद लुटायला मन लागतं. ते पैश्यांच्या बाजारात विकत मिळतं नाही.
कोरोना नावाच्या भुताचं मनांवर सावट असतांना, पूर्वी सायकलची दांडी टोचायची आज परिस्थितीचे काटे टोचतात. आज परत एकदा, आपण डोळे उघडावेत आणि भीती मागे राहुन असंख्य दिव्यांनी उजळलेली वाट माझ्या सहित सगळ्यांच्या वाट्याला यावी, असं मनोमन वाटत राहतं. प्रकाशित वाट दाखवणारं माणुस सगळ्यांनाच लाभावं!

Comments

  1. तुम्ही लिहीत रहा, आम्ही वाचत राहू
    छान....

    ReplyDelete
  2. छान लिहिले आहे. असंच लिहिते रहा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ये इश्क, मुझे इश्क है तुमसे..

Radheshyam Ji Shraddhanjali

Satguru Babaji