पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : किसन माळी जी (नाना)
नाना - काही माणसं आपल्याचं जगातली असतात तरी ती आपल्या आपल्या जगातली नसतात. नाना असे विलक्षण होते. कर्मठ सेवादार, सत्गुरू वरचा विश्वास चेहऱ्या वरच्या हास्यात सामावलेला होता. भेटणाऱ्याला पहिले नानांची एक थाप पाठीवर आधी भेटायची आणि मग नाना भेटायचे! पण ती थाप आपुलकी बनवुन जायची. माझं लग्न झाल्यानंतर, गोपी अँड पार्टी मधल्या ज्या शेकडो कुटुंबांचं मिळून माझं कुटुंब झालं, त्यातले किसन माळीजींचे कुटुंब आहे.
अनेक वर्ष समागम सुरु होण्याच्या आधी ते तयारीत दिसत रहायचे. सेवेत व्यस्त आणि हरिनामात व्यस्त! असे. जवाबदाऱ्या होत्या पण त्या सत्गुरुच्या आधारावर पेललेल्या, त्यामुळे त्यांचं ओझं झालं नाही. मी त्यांना कधीही घाई गडबडीत बघितलं नाही. संत होते, संथ होते, सहज होते.
आम्ही सहकुटुंब त्यांच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो. आम्ही लग्नाला गेल्याच्या आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आम्हाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्यांना झालं होतं. 'गुरसिख नु जद गुरसिख मिलदा वेख के चाह चढ जांदे ने' ते मला त्या दिवशी अण्णा आणि त्यांच्या भेटीला बघून वाटलं. आम्ही निघालो तेव्हा त्यांचा मुलगा अण्णाना मिठी मारून रडला होता. अण्णा एक टूर पुढे ढकलून लग्नाला पोहचले म्हणून ही कृतज्ञता त्याच्या डोळ्यातुन वाहिली होती. इतका जिव्हाळा या साऱ्यांनी आम्हाला दिला आहे.
लॉकडाऊनच्या काळातही मेहफील सजतच आहेत. गेले अनेक दिवस online ब्रह्मचर्चेचा आनंद आम्ही सगळेच घेत आहोत. मला login करायला थोडा उशीर झाला तरी नाना रोज वेळेवर. एका एका कानात इअरफोन्स घालुन नाना नानी 'अनहद नाद' ऐकत बसलेले. मागच्या आठवड्यातच तर अण्णांना फोन करून तुम्ही मुलाच्या वाढदिवसाला गाणं म्हणायला सांगितलं होतं. सगळं छान साजरं झालं.
काल रात्रीचं तर बघितलंय मी यांना! आणि आज नाना मेहफील मधून उठुन गेलेत. इतक्या सहज की कुणाला काही कळलंही नाही. मुलाने मेहफील भरवावी, पित्याने श्रोता म्हणून त्यात सामील व्हावं आणि मेहफील मनात घेऊन तिथून निघून जावं. मला वाटतं, मुलांचे हाथ सत्गुरुच्या हातात देऊन यशस्वी पालक बनुन नानांनी exit घेतली आहे.
तुमच्या स्वतःच्या मुलांबरोबर अनेक मुलं आज हळहळत आहेत. तुम्ही दिलेलं प्रेम आणि तुम्ही गेल्या नंतरही उरलेलं प्रेम आम्हाला 'गुरुदरबारी तोड निभावणं 'काय आहे हे सांगत राहीलं.
आज लॉकडाऊन मध्ये तुमचं अंतिम दर्शन काही कोरोना घेऊ देणार नाही. पण बरच झालं! ज्यांनी गुरुकृपेत आयुष्य घालवालं आणि गुरुकृपा अनुभवत, उच्चारत जे वैकुंठाला निघाले... त्यांना आम्ही हसत, नाचत आणि गातचं डोळ्यांत सामावुन ठेवू.


Kuap mast ji
ReplyDeleteधन्यवाद अमृता ताई... खूप छान.. 🙏🙏
ReplyDeleteSundar
Delete