पॉझिटिव्ह माणसांची खरी गोष्ट : सुजाता आणि सुहास पाटील
सुरवात सुहास पाटील या पासुन.. हा मला भेटलेला अत्यंत विचित्र माणुस आहे, तरी हा माझा शाळेच्या दिवसांपासूनचा मित्र आहे. हा मला कोणत्या वर्षी भेटला ते मला सांगता येणार नाही. पण वार नक्की बुधवार होता, कारण हा मला पदमा मावशीच्या घरी होणाऱ्या सत्संग मध्ये भेटला होता. सत्संग संपल्या वर आम्ही बाल्कनी मधल्या उंबरठ्यांवर ''डोंगर का पाणी'' खेळायचो. मग हा माझ्या शाळेत असल्याचं कळलं आणि शाळेत याचं सारखं दर्शन होऊ लागलं. कारण, सुहास ला सारखं वर्गाच्या बाहेर उभं केलं जायचं. त्याचं कारण त्याची न संपणारी बडबड असावी. (सुहास पाटील हा मनुष्य प्राणी आजही continue बोलतो. त्या मध्ये स्वल्प विराम, अल्प विराम, पूर्ण विराम काहीच नसतं. हा व्यक्ती सलग बोलतो. ) वर्गाच्या बाहेर उभं असल्यावर एखाद्या मुलाच्या चेहऱ्यावर जो अपराधी भाव असायला हवा. तो याच्या चेहऱ्यावर कधीच आला नाही. साधारण माणसांचे बरेच गुण या व्यक्ती मध्ये नाहीयेत. आजही त्याच्या माझ्या संभाषणातल्या ८०% वेळा मी त्याला, तुला शिस्त कशी नाहीये, आणि तू कसं सुधारायला पाहिजे आणि कमी बोलायला पाहिजे हे त्याला समजावत असते. बऱ्याच वेळा ओरडत असते. साधारण माणसाला समोरचा माणुस ओरडला तर... माणुस समोरच्याचं म्हणणं ऐकुन सुधारण्याचा प्रयत्न करतो, चिडतो किंवा ओरडणाऱ्याला ignore करतो. मी ओरडते तेव्हा सुहास पाटील हसत असतो आणि 'अजून बोल बाई मला मज्जा येतेय' अश्या reactions देतो.
तरी हा अभ्यासात topper वगैरे कॅटेगरी मध्ये यायचा..मी फार मेहनत करून पंच्याहत्तरी गाठायची..
पुढे आम्ही मोठे झालो. कन्नमवार नगर वरून विक्रोळी स्टेशन ला ३९४ आणि ३९७ अश्या दोन बस येतातं. दोन्ही बसेस ची frequency एकदम चांगली आहे. share रिक्षा पण जास्त पैसे घेत नाहीत. सुहासची परिस्थिती फार गरिबीची पण नाहीये, तरी सुहास स्टेशन ला सारखा चालत का जातो? मला या प्रश्नाचं उत्तर ''सुजाता'' असं मिळालं.
ती अत्यंत देखणी आणि मनात भरण्यासारखीच आहे. पण ती सुहास ला पटली याचं मला फार कौतुक वाटतं. स्वभाव बघितले तर ही दोन टोकाची माणसं आहेत. सुहास प्रचंड बोलतो, सुजाता खूप कमी. त्याने जोक केला की मी आणि ऋती (माझी बहीण) तिरके डोळे, अजून खोचक करून, ''आत्ता आम्ही हसायचं का??''असे लूक्स देतो. तेव्हा सुजाता पोट धरून हसत असते. त्यामुळे सुहास आणि सुजाता च व्यवस्थित पटून गेलं आहे, असं मला वाटत. विशेष म्हणजे लग्नाला १ दशक पार पाडूनही..त्याला हसवता येत, तिला हसता येत.
साधारण माणसाला १-२, फार फार तर ५-१० जवळचे जिवलग असतात. सुहास पाटीलजींना १०० (कमीतकमी) आहेत. आणि त्या सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम्स आपलेच आहेत. असं समजुन ते solve करतचं , हे व्यक्तिमत्व रोज ३ वाजता रात्री झोपतं. त्यात कोणी रात्री २ वाजता मदती साठी बोलावलं, तर जगात कोणी जाणार नाही. पण सुहास नक्की जाईल, हे मी स्टॅम्प पेपर वर लिहुन देऊ शकते.
सुहास सुजाता च लग्न जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पार पडलं. वार्षिक निरंकारी संत समागम महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेला. या दोघांनी लग्नानंतर फिरायला न जात सेवा करणं पसंत केलं. आणि ऑफिस मधुन मिळालेली सुट्टी सेवेत घालवली. दोघांचा मिळुन मिसळुन घेतलेला निर्णय होता, त्यामुळे ''सेवा आणि सत्गुरू ' ही या दोघांना बांधून ठेवणारी गोष्ट आहे.
मी माझ्या एका depression च्या ओघात त्याला नेरळ वरून फोन केला. माझा रडका आवाज ऐकुन त्याने मला ठाणे स्टेशन ला किती वाजता पोहचशील असं विचारलं..मी म्हटलं १ तास. मी पोहचायच्या आधी एक बॅग खांद्या वर तिरकी लटकवुन हा माझी वाट बघत होता. त्याला शक्य असलेल्या सगळ्या गोष्टी त्याने माझे प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी केल्या आहेत. माझ्यासाठीचं नाहीत अनेकांसाठी. तो सिविल engineer आहे म्हणुन नशीब..नाही तर त्याने मॅरेज ब्युरो पण चांगला चालवला असता. तो सगळ्यांसाठी available असतो. आणि त्याच्या जिवलगांमध्ये सगळ्या कॅटेगरी चे लोक तुम्हाला सापडतील. कॉलेज ला जाणारे, नोकरी-बिझनेस झाले, २० वर्षां पासून ५० वर्षां पर्यंतच्या वयाचे, अशिक्षित, सुशिक्षित, गावचे, शहरी सगळे... त्याला सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करता येत असतीलच असं नाही. पण बऱ्याच वेळा आपले प्रॉब्लेम्स ऐकायला कोणीतरी हवा असतो. आणि सुहासची हे ऐकून घेण्याची खूप कॅपॅसिटी आहे. तो जीव लावुन ते सोलव्ह करायचा प्रयत्न पण करतो.
त्याला जीव लावता येतो. पदमा मावशी हा माझ्या आणि सुहास च्या लहानपणीच्या मैत्रीला जोडणारा एक दुवा आहे. ज्या मावशी तिच्या शेवटच्या घटका मोजत होती. आणि सुहास आला. आज पर्यंत नेहमी मी रडत आणि सुहास हसवत आलेला आहे. त्या दिवशी मात्र मला आणि सुजाताला त्याला आवरणं कठीण गेलं होत. ज्या बाल्कनी मध्ये आम्ही डोंगर का पाणी खेळून मोठे झालो होते, तिथेच दोन्ही हातांमध्ये तोंड लपवुन हा ओक्सबोक्शी रडला होता. त्याने त्या दिवशी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आजही माझ्या कडे नाही... सांग मला की,''आजनंतर आपण कोणाला सांगायचं की मावशी गा ना...अजि सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनु, हरी पहिला.'' आम्ही एकाच मेहफिली मध्ये वाढलोय असं म्हणायला हरकत नाही.
माझ्या आणि संदेश च्या लग्नाच्या आधी काही वर्ष सुजाता आणि सुहास च पण लग्न झालेलं. आम्हाला advit (आमचा मुलगा) लग्नानंतर ६ वर्षांनी झाला. त्यामुळे ४-५ वर्ष मी आणि संदेश एका अघोरी treatment च्या phase मधून गेलेलो. सुहास आणि सुजाताच पण तसंच काहीसं चालु होत. आमची गुड न्युज आली तेव्हा सगळ्यात आधी ज्यांना सांगायला हवं त्या मध्ये सुहास सुजाता होते. मी सुजाता ला कॉल करायच्या आधी ४-५ वेळा विचार केला... की माझ्या आनंदाच्या भरात सुजाता सुहास ला दुखावत तर नाहीये ना?? पण मी त्यांच्या पासुन लपवुन पण ठेवु शकले नसते. पण या दोघांची reaction खूप वेगळी होती. आमच्या पेक्षा जास्त आनंद सुहास सुजाता ने व्यक्त केला. मग ते मला भेटायला आले. त्यांचं दुःख बाजूला ठेवून त्यांनी माझ्या आनंदात आनंद मानला. सुजाता ने माझ्या डोहाळे जेवणाच्या सगळ्या arrangement मध्ये भाग घेतला. ती माझ्या आनंदासाठी नाचत होते. आणि मी तिच्या साठी प्रार्थना करत रडत होते. सुहास कार्यक्रमाला वेळेवर पोहचलाच नाही. संपतांना आला. मी इतकी चिडले त्याच्या वर की कॅटरर वाल्याला मी याला जेवायला देऊ नका असं सांगितलं. कॅटरर वाला हातातली पुरी ताटात टेकवू की नको अश्या pose मध्ये होता. पण सुहास नेहमीसारखा माझ्या बोलण्याचा काही परिणाम न झाल्या सारखा बडबड करत जेवला.
साधारण माणसं surprize द्यायला जातांना, ज्याला surprize द्यायचं आहे तो जागेवर आहे का हे बघतात ना?? सुहास मला surprize द्यायला आल्या वर मी घरी नसल्याचं surprize स्वतः घेऊन तो परत गेला आहे. जातांना मला त्याचं येणं खरं वाटावं म्हणून, माझ्या बिल्डिंग मधल्या nameplates - watchmen यांच्या बरोबर selfie काढून याने मला पाठवल्या आहेत.
तर असा हा मी आधी सांगितल्या प्रमाणे विचित्र आहे. पण आत्ता सुहास आणि सुजाताच गोंडस कॉम्बिनेशन घेऊन ''सौंदर्या ''आली आहे. तिने खूप बडबड करून सुहास ची बडबड बंद करून टाकावी अशी माझी खूप इच्छा आहे.
जगण्याच्या धावपळीत अनेक माणसं भेटतात. जी तुम्ही चूक की बरोबर असं judge करतात, तुमचं मूल्यांकन करतात. काही नाती तुम्हाला judge न करता, तुम्ही आहात तशी तुम्हाला तुमच्या गुण दोषांसहित स्विकारतात, आणि बदल्यात काही अपेक्षा पण नाही करत. तसे सुहास आणि सुजाता मला स्वीकारणारे आहेत. कोरोना नंतरच्या काळात मलाही सगळ्यांना तसं स्विकारणं जमु दे.



Comments
Post a Comment